तळकोकणात गणपतीच्या आसनाच्या वर माटी सजवण्याची खूप जूनी परंपरा आहे. वरच्या कोकणात #मंडपी, तळकोकणात #माटी तर गोव्यात #माटोळी अश्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
माटी म्हणजे लाकडाची आयताकृती चौकट असते व त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या रचलेल्या असून चार बाजूंना चार खूर असतात. माटी ही सागवानी किंवा फणसाच्या लाकडापासून बनवलेली असते. या माटीवर परिसरात आढळणाऱ्या औषधी व आकर्षक वनस्पती बांधल्या जातात. अश्याप्रकारे माटी ही गणपती सजावटीची एक पर्यावरणपूरक पद्धत आहे.
पूर्वी माटीची चौकट ही तयार नसायची. दरवर्षी नवीन चौकट तयार करावी लागायची. त्यावेळी भेरला माडाच्या खोडांच्या छेदांपासून माटी तयार केली जाई. भेरला माड उपलब्ध नसल्यास बांबूपासून सुद्धा बांधली जायची. माटीसारखीच कोकणातल्या चुलीच्या वर एक बांबूंची रचना असायची त्याला #उतव असे म्हटले जाई. उतवाचा उपयोग पावसाळ्यात फटकूर-कांबळी, कपडे किंवा इतर गोष्टी सुकवण्यासाठी केला जाई.
गणपती मंडपाची पर्यावरणपूरक सजावट हा माटीचा सरळ उद्देश दिसून येतोच. पण माटी बांधण्याचे नक्की कारण काय हे पाहायला गेले तर काही आख्यायिका अश्या आहेत. की पूर्वीच्या काळात कोकणातील घर कौलारू तर त्यावर सगळ्यात जास्त त्रास असतो तो माकडांचा. माकडे कौलावर नाचून कौले फुटल्याचे कितीतरी प्रसंग व्हायचे. पुजलेल्या गणपतीला याचा त्रास होऊ नये म्हणून कदाचित ही लाकडी चौकट आसनाच्या वर बांधली गेली असावी. याच चौकटीचा वापर करून त्यात सजावट केली गेली. गणपतीचे रूप हत्ती. हत्तीला आवडणारे नैसर्गिक वातावरण घरात निर्माण करता यावे म्हणून रानबहार माटीत बांधला गेला असावा.
माटीच्या वर #डाळी टाकण्याची सुद्धा प्रथा असायची. डाळी हा बांबूच्या वेतांपासून विणून तयार केलेला चटईसारखा भाग असायचा. डाळीचा उपयोग म्हणजे कौलातून झिरपणारे पाणी, कचरा किंवा पाल, उंदीर, विंचू सारख्या प्राण्यांचा शिरकाव थांबवणे. गणपतीच्या काही दिवस आधी कुळाचा गावकर (महार) #डाळी व नारळ ठेवण्यासाठी #पडली देऊन जायचा. तसेच महार, न्हावी, सुतार व इतर बलुतेदार कुडवाळ्याकडून आपल्या मानाचा सणाचा नारळ घेऊन जात. गणपतीच्या आसनाखाली पडली मध्ये गणेशाचे प्रतीक म्हणून नारळ ठेवण्याची पद्धत आहे. हा नारळ उतरलेला म्हणजे झाडावरून न पाडता अलगद खाली #उतरलेला_नारळ असावा लागतो. गणपतीच्या बाजुलाच गौरी व महादेव पुजले जातात. महादेवाच्या रुपात ठेवलेला नारळ सुद्धा उतरलेलाच असावा लागतो. गौरी मध्ये आंब्याचा टाळ, हरण, हळद, कनकीचा (बांबूची मोठी जात) पाला, तेरडा, अळू, सरवड अश्या एकूण पाच किंवा सात वनस्पतीच्या फांद्या असतात. माटीची सुरवात होते ती आंब्याचा टाळ मध्यभागी बांधून. कोकणात परंपरा आहेच जिथे शुभकार्य करायचे असते त्या जागेवर आंब्याचा टाळ म्हणजे आंब्याची पाच ते सात पाने असणारी फांदी बांधली जाते. माटीत सर्वप्रथम सोललेला नारळ बांधला जातो. शिप्टा, कातरो, बेडे म्हणजेच सुपारीच्या फळांचे घोस देखील माटीत बांधले जातात. यावेळी उपलब्ध असलेली फळे माटीला बांधण्याची प्रथा आहे. प्रामुख्याने यात तवसा-काकडी, चिबुड व केळ्याचा घड यांचा समावेश असतो. बेल व शमी या पत्रींच्या फांद्यासुद्धा माटीत बांधल्या जातात. सावंतवाडीची लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. तर यातलीच लाकडी फळे सुद्धा काही ठिकाणी माटीत बांधतात.
पावसाळ्यात कोकणी घराभोवती परसबाग लावली जाते. यात #तवसा म्हणजे काकडीची मोठी जात, दोडकी, भेंडी, वाली, अळू, करांदा, लाल भाजी यांचा समावेश असतो. काही घरांमध्ये परसबागेतील या सर्व भाज्या सुद्धा माटीला बांधण्याची प्रथा आहे.
माटीला सजावटीसाठी कितीतरी रान वनस्पती बांधल्या जातात. या वनस्पती दिसायला सुंदर असतातच पण त्यांना औषधी गुणधर्म देखील आहेत. हरणाची पिवळीधम्मक फुले, कवंडाळाची चेंडूसारखी लाल-पिवळी फळे, कांगुणीच्या पिवळ्या लाल फळांचे घोस, सरवाडीचे शुभ्र पानांसारखे असणारे संदल, तेरड्याची गुलाबी फुले, आयनांचा चित्रविचित्र आकार, कळलावीची आगीसारखी दिसणारी पिवळी-केसरी-लाल फुले आणि नागकुड्याची वाघनखांसारखी दिसणारी पिवळी-लाल फळे माटीला एक वेगळेच सौंदर्य प्रधान करतात. या सर्व रानवनस्पतींची विस्तृत माहिती खालील पोस्ट मध्ये दिली आहे.
https://www.facebook.com/100007528816241/posts/2326507347610203/
रानबहार माटीला बांधण्यामागचे शास्त्र शोधायचे म्हटले तर या सर्व वनस्पती खुप औषधी असतात. माटीच्या माध्यमातून यांची जनमानसात ओळख होते आणि माटीच्या उपयोगी म्हणून संवर्धनही केले जाते. अजून एक मला वाटणारी गोष्ट म्हणजे या रानबहाराचा गंध दरवळ देखील आरोग्यदायक असतो. त्यामुळेच माटी बांधल्यानंतर घर प्रसन्न होऊन जाते.
माटीला #न्हेवर्यांचा_नवस बोलण्याचीही पद्धत असायची. एखादे कार्य पूर्ण व्हावे म्हणून माटीला नवस बोल्ला जाई आणि पूर्ण झाले की माटी बांधताना करंज्या (न्हेवरे) दोर्यात ओवून माटीला बांधल्या जायच्या. पहिल्या दिवशी रात्री भजन झाल्यावर करंज्यांचा नैवेद्य ठेवला जाई. गाऱ्हाणे घालून कार्य पुर्ण झाल्याबद्दल आभार मानले जात आणि त्यानंतर माटीला बांधलेल्या करंज्या काढून भजनी मंडळींना प्रसाद म्हणून वाटल्या जात.
बाप्पाला निरोप देताना पाटावर शिदोरी ठेवली जाते. या शिदोरीत दोन हळदीच्या पानात एकामध्ये करांदा व पंचखाद्य तर दुसर्यात पानाचा विडा बांधलेला असतो. गणेश विसर्जनाच्या वेळी माटीला बांधलेला नारळ फोडून त्याच्या पाण्याने गणपतीचा अभिषेक केला जातो. आणि गणपती विसर्जनानंतर या नारळापासून तयार केलेली #शिरनी म्हणजे नारळाच्या कातळीचे तुकडे प्रसाद म्हणून वाटली जाते. माटीला बांधलेली इतर फळेही प्रसाद म्हणून वाटली जातात.
कोकणात अश्या कितीतरी परंपरा आहेत. कोकणी लोकांचे जीवन हे कायम पर्यावरणपूरकच राहिले आहे. परंपरांच्या मागे कित्येक शास्त्रीय कारणे असतात. ती आपल्याला कळत नसल्याने आपण त्या परंपरा स्वीकारत नाही किंवा चुकीच्या ठरवतो. पण अश्या परंपरांचा सखोल अभ्यास व्हावा व तसेच त्या जपल्या पण जाव्यात.
प्लास्टिक किंवा थर्माकाॅलच्या पर्यावरण घातक गोष्टींऐवजी माटी किंवा माटी सारख्या पर्यावरणपूरक गोष्टींचा उपयोग करून गणपती सजावट केली जावी. मात्र हे ही लक्षात ठेवावं कि निसर्गाचा ओरबाडा होणार नाही. माटीत वापरली जाणारी फळे ही परिपक्व असावी म्हणजे त्यातून बीजप्रसारही होईल. या झाडांचे प्रमाण कमी होत चाललय त्यामुळे अश्या झाडांचे संर्वधन करणेही फार गरजेचे होत आहे.
- नितीन कवठणकर
पाल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
शेअर नक्की करा पण नाव पुसुन नको
गणपती बाप्पा मोरया🙏
Original post date : 21 August, 2020