॥ श्री देव काजरोबा जत्रोत्सव, कवठणी ॥
आज दि. 22 फेब्रुवारी 2021 कवठणी येथील "श्री देव काजरोबा जत्रोत्सव". ही जत्रा माघ शुक्ल दशमी ला साजरी केली जाते.
श्री देव काजरोबाचा वास काजर्याच्या झाडावर असल्यामुळे हे देवस्थान काजरोबा म्हणून ओळखले जाते (काजरा - Strychnos nux-vomica).
श्री देव काजरोबा हे जागृत देवस्थान आहे. देवाला बोललेला नवस पूर्ण झाला की भाविक जत्रेला केळ्यांचा घड बांधून नवस फेडतात. त्यामुळे ही जत्रा "घडांची जत्रा" म्हणून प्रसिद्ध आहे. रात्री या घडांचा लिलाव घातला जातो. त्यानंतर पार्सेकर दशावतार यांचा नाट्यप्रयोग होतो. नाटकादरम्यान कुडीवर वारे (अवसार) उभे राहते. अवसारी देव देवळाजवळील तलावात आंघोळ करुन देवळात येतो व एका दशावतार्याच्या हातात घडांच्या लिलावातून जमलेल्या पैश्यांतील पोसाभर रक्कम देतो.
केळ्यांच्या घडांची जत्रा ही खूप कल्पक परंपरा आहे. या परंपरेच्या कारणाने केळ्याच्या "सोनयाळ", "मनयाळ" सारख्या स्थानिक जातींची शेती होते व या स्थानिक वाणांचे संवर्धन केले जाते. सोनयाळ व मनयाळ या तळकोकणातील केळ्यांच्या दोन स्थानिक जाती आहेत. सोनयाळ ही मनयाळ पेक्षा सरस मानली जाते. दोन्ही जातींची केळी लहानच असतात. सोनयाळ केळी जरा बारीक पण चवीला मधूर गोड तर मनयाळ केळी जरा फुगीर व मध्यम गोड असतात.
श्री देव काजरोबाच्याच शेजारी श्री देवी माऊली व श्री देव रवळनाथ यांची मंदिरे आहेत. तसेच श्री गणेश मंदिर व गावातील इतर देव इथेच आसनस्थ आहेत.
कवठणी हे सावंतवाडी तालुक्यात तेरेखोल नदीच्या काठी वसलेले गाव. हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर पडते. सातार्डा व किनळे या दोन गावांच्या मध्ये कवठणी गाव आहे.
- नितीन कवठणकर